मंगळवार, ३ मार्च, २०२६

मिश्किल, मृदु स्वभावी गुलाबराव सरांचे असे अचानक जाणे....

वैद्यनाथ विद्यालयातील माधवबागच्या शाखेत शिक्षण घेतलेल्या जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रिय शिक्षक असलेले श्री गुलाबराव देशमुख सर... अगदी नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावात गुलाबाच्या सुगंधाची आणि कोमलतेची जाणीव व्हायची.... सद्गुणांचा सुगंध आणि मायेच्या ममतेने विद्यार्थ्यांशी बोलणे - वागणे यामुळे विद्यार्थ्यांना प्रिय झालेले शिक्षक... शिकवायचे इतिहास आणि हाती नसायचे पुस्तक! खळाळता प्रवाह जसा सहजगत्या पुढे जातो तसेच अगदी त्यांच्या तासात विद्यार्थी रममाण व्हायचे....

अमूक तमुक ढमूक.... हा त्यांच्या सहज बोलण्यात वापरला जाणारा शब्दप्रयोग मला वाटते विद्यार्थ्यांना आजही चांगलाच आठवत असेल ..... प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक ओळख आणि त्याच्याशी जोडलेले नाते, पाठ शिकवत असताना प्रसंगयोचित त्यांनी केलेले सात्विक विनोद यामुळे त्यांचा तास कधीच संपू नये असे विद्यार्थ्यांना वाटायचे.... त्यांचे अनेक माजी विद्यार्थी आजही त्यांच्या संपर्कात होते... त्यांचा तास अचानक असा 2 मार्च 2026 रोजी संपला....

अगदी काल-परवापर्यंत चांगले चालते - बोलते असणारे सर असे अचानक आपल्यातून निघून जातील असे त्यांच्या कुटुंबीयांना आणि विद्यार्थ्यांनाही वाटले नव्हते....

जवळपास प्रत्येक गुरु पौर्णिमेला सरांच्या भेटीचा निश्चय मी केलेला होता आणि मागच्या अनेक वर्षात घरी जाऊन त्यांच्याशी मनमुराद गप्पा ही मारायचो...

1993 ला माझे डीएड सुरू असताना अंबाजोगाईच्या बस स्टँडवर सरांची भेट झाली त्यावेळी 'इकडे कसे काय?' असे विचारल्यानंतर सरांनी एमए करत असल्याचे सांगितले... अखंड शिकत राहण्याचा मार्ग त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वानुभवातून दिला.

मागच्या साडेतीन-चार महिने अगोदर सरांच्या मिसेसचे निधन झाले.... सेवानिवृत्तीनंतर सरांचा घरी अधिक वेळ जायचा आणि दोघांचे नाते अधिकच दृढ झालेले होते... त्यावेळी आम्ही भेटायला गेल्यानंतर वहिनींच्या आठवणीत सर रडले होते.... विद्यार्थ्यांना जीवनातील विविध विषयाचे ज्ञान देणारे आमचे गुरु त्यावेळी किती भावनिक होते याची प्रचिती आली.... वहिनींच्या आठवणीतच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे कदाचित लवकरच ते आपल्याला सोडून गेले....

माझ्या वयाच्या पन्नाशीत आजही कधी - कधी जेव्हा उदास वाटायचे तेव्हा सरांना भेटायला जायचो..... गप्पांतून प्रेरणा मिळायची, उत्साह वाढायचा....

10 वी 1991 बॅचच्या आदरणीय श्री गुलाबराव देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना... (अजूनही त्यांच्या नावापुढे कैलासवासी लावण्याची हिंमत होत नाही)  


चंद्रशेखर फुटके

 

३ टिप्पण्या:

  1. भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    उत्तर द्याहटवा
  2. गुलाबराव गुरुजीं नी इतिहास शिकवताना कधीही पुस्तक हातात घेतले नाही हे तुमचे खास वैशिष्ट्य होते, तयारी अशी करून घेत होते की चोघाच्या खांद्यावर जाताअसताना ही उठून उत्तर द्या म्हणायचे .विनम्र नतमस्तक व्हावे असे खरोखरच आदर्श शिक्षक....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी बरोबर मित्रा.... रात्री दोन वाजता कोणी झोपेतून उठवले तरी उत्तर आले पाहिजे

      हटवा