रविवार, ५ एप्रिल, २०२६

ज्ञान, विचार आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम : शेखर अंकल


 ज्ञान, विचार आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम .

आदरणीय शेखर अंकलांना वसंतगंधित वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 


वसंताच्या मंद सुवासिक झुळुकीत, नव्या पालवीच्या कोवळ्या हिरवाईत आणि फुलांच्या उमलत्या सौंदर्यात जसा नवा उत्साह, नवी उमेद आणि नवचैतन्य दडलेले असते, तसाच आशय आपल्या व्यक्तिमत्त्वात सामावलेला आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या आपल्या कार्याची ही वसंतासारखी सृजनशील, प्रेरणामय आणि जीवनदायी छटा आज पुन्हा एकदा स्मरणात उजळून येते. 

आदरणीय चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके सर

आपली शिकवणी ही केवळ ज्ञानदानाची प्रक्रिया नसून, ती विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात स्वप्नांची पालवी फुलवणारी, आत्मविश्वासाचे अंकुर रुजवणारी आणि व्यक्तिमत्त्वाला तेज देणारी एक सृजनयात्रा आहे.

विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून आपण आपल्या विचारांच्या ऊबेतून आणि आचरणाच्या सात्त्विकतेतून असंख्य जीवनांना नवी दिशा दिली आहे.

जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक म्हणून.

आपण विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांचे ज्ञान दिले नाही, तर त्यांच्या अंतर्मनात जबाबदार नागरिकत्वाची जाणीव, मूल्यांची जपणूक आणि कर्तृत्वाची आस जागवली.

आपल्या ओजस्वी संवादकलेतून आत्मविश्वासाचे बीज पेरले,

समाजातील बालविवाह निर्मूलन आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य हे आपल्या सामाजिक बांधिलकीचे तेजस्वी प्रतीक ठरले,

आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आपण असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा वसंत फुलवला. 

आपल्या या निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेला विशेष सन्मान हा केवळ गौरव नसून, आपल्या समर्पणाच्या साधनेला लाभलेला समाजाचा कृतज्ञ प्रणाम आहे.

आज आपल्या वाढदिवसाच्या या मंगल क्षणी मनापासून अशी प्रार्थना

जसा वसंत ऋतू वर्षागणिक नव्या रंगांनी आणि नव्या उत्साहाने धरतीला बहरवतो, तसाच आपल्या जीवनातही आरोग्य, आनंद, यश, समाधान आणि प्रेरणादायी कर्तृत्वाचा सुगंध सतत दरवळत राहो! 

म्हाळसाकांत कृपेने आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सौख्य, समृद्धी आणि अखंड समाधान लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आदरणीय शेखर अंकल! 

____

 श्री प्रकाश खोत

म्हाळसाकांत पान सेंटर....✍️

(02.04.2026)

रविवार, ८ मार्च, २०२६

तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये साजरा!






स्वतःचा उत्कर्ष कसा करावा याचा संवाद साधणारा कार्यक्रम, पाककलेच्या कौशल्येला वाव देणारा आनंद नगरीचा कार्यक्रम आणि महिलांच्या आरोग्याला थोडासा हातभार लावणारा फ्री डेंटल चेकअप कॅम्प असा तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुरेखा बांगर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रुपाली फड आणि प्रा वंदना जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने व्यासपीठावर बसण्याची संधी सौ पूनम भुतडा यांना मिळाली. विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका आणि फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले. 

शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आनंद नगरी, फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन महिला दिनानिमित्ताने करताना आनंद होत असल्याचे सांगितले. 

डॉ सौ रूपाली फड यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची सुचित केले. 

डॉ सौ सुरेखा बांगर यांनी कर्तृत्वान स्त्रियांची आठवण करून देत आपण कसे वागावे याचे उत्तम उदाहरण महिलांना दिले. त्यांचा हसत खेळत झालेला हा संवाद महिलांना खूप आवडला. 

प्रा डॉ सौ वंदना जगतकर यांनी या आनंदनगरीचे परीक्षण केले. आपल्या मनोगतात त्यांनी सकस पौष्टिक आहाराचे महत्वही महिलांना सांगितले. 

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आनंदनगरीचे तसेच फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे उद्घाटन झाले आणि आनंद सोहळ्यास सुरुवात झाली. आरोग्यास पोषक आणि जिभेला सुखाविल अशा अनेक खमंग पदार्थांची मेजवानी उपस्थित महिलांना या ठिकाणी मिळाली. सुमारे दोन तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या आनंदनगरीचा आस्वाद परिसरातील अनेक महिला, पुरुष तसेच बालगोपाळांनी घेतला. 

प्रमुख अतिथींचे तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांचे अनोख्या पद्धतीने स्कॉलर केजी स्कूलच्या स्टाफने स्वागत केले. मंडप, रांगोळी, आकर्षक बॅनर, फुले, रंगवलेले बोर्ड याने शाळेचे प्रांगण या सोहळ्यासाठी दिमाखदार पद्धतीने सजवण्यात आले होते. 

बहारदार संचलन सौ प्रमिला कदम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रमिला कदम, सौ राजश्री हलकंचे, सौ संगीता रोकडे, सौ ज्योती वळसे, सौ रुचिता वाडे, सौ अमृता मालेवार यांच्यासह सौ सुनेना गुट्टे सौ अश्विनी मुंडे, सौ वेणूताई तांदळे यांनी परिश्रम घेतले. सौ शोभा शांतलिंग फुटके यांनी परीक्षणासाठी प्रा डॉक्टर जगतकर यांना सहकार्य केले.

आनंद नगरी पाककला स्पर्धेतील विजेते : प्रथम सौ कल्पना सोळंके, द्वितीय सौ योगिता नागरगोजे, तृतीय सौ शुभांगी उदगीरकर व उत्तेजनार्थ सौ मंगला सारस्वत.

मंगळवार, ३ मार्च, २०२६

अभ्यासाची ऊर्जा वाढवत आहेत सामान्य ज्ञानाच्या परीक्षा!


 


*सामान्य ज्ञान स्पर्धा पेटवत आहेत अभ्यासाची ऊर्जा!*

 सामान्य ज्ञानाची पुस्तिका दिल्यानंतर स्पर्धांची घोषणा झाली आणि पहिल्या स्पर्धेतील विजेत्यांना जेव्हा आकर्षक प्रमाणपत्र आणि नगदी बक्षीस मिळाली तेव्हा दुसऱ्या स्पर्धेसाठी विद्यार्थी उत्साहाने तयारीला लागले होते.

सामान्य ज्ञानाच्या परीक्षा क्रमांक एक मध्ये पुस्तिकेत असलेले प्रश्न क्रमांक एक ते शंभर देण्यात आले होते.

वैयक्तिक आणि गटात अभ्यास कसा करावा एकमेकांना प्रश्न कसे विचारावेत याचे मार्गदर्शन गुरुजनांनी केल्यानंतर विद्यार्थी मधल्या वेळेत, घरी आणि गटात बसून, वेळ मिळेल तेव्हा छान अभ्यास करत होते.

स्पर्धा क्रमांक एक तीन फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. छापील प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर विद्यार्थ्यांना तीस मिनिटांचा वेळ सोडवण्यासाठी देण्यात आला. बाहेरच्या मैदानात, भरपूर अंतर घेऊन, कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा संपन्न होत आहेत. इयत्ता 4 थी ते 7 वी या प्रत्येक वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला नगदी 25 रुपये तसेच आकर्षक प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात आले.

'आता दुसऱ्या परीक्षेत माझा क्रमांक काढतोच!' असे म्हणत जिद्दीने मुली आणि मुले अभ्यासाला लागली होती. 28 फेब्रुवारीला दुसरी परीक्षा तेवढ्याच उत्साहात संपन्न झाली. 


*सुपर ग्रुप* 


परीक्षा क्रमांक एक मध्ये जे विद्यार्थी प्रत्येक वर्गातून प्रथम आलेले होते ते सुपर ग्रुप मध्ये निवडण्यात आले. त्यांना आता दुसऱ्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 1 ते 100 मधील 10 प्रश्न आणि 101 ते 200 मधील 15 प्रश्न अशी वेगळी 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगला व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांना त्या वर्गातून बक्षीस मिळण्याची संधी मिळावी हा दुहेरी उद्देश होता.

सुपर ग्रुप मध्ये चार विद्यार्थी गेल्यामुळे प्रत्येक वर्गातील राहिलेल्या विद्यार्थ्यांना 'आता माझा नंबर येईल' म्हणून आशा निर्माण झाली होती आणि ते जिद्दीने अभ्यासाला लागले होते. 


*दुसऱ्या परीक्षेची वैशिष्ट्ये*

इयत्ता पाचवी वर्ग अभ्यासात अधिकच जिद्दीने लागल्याचे दिसून आले. 25 पैकी 25 गुण घेऊन दोन विद्यार्थी समान स्थितीवर होते. (स्वप्निल आणि अमृता) त्यांना तोंडी प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून एकाचा प्रथम क्रमांक काढण्यात आला. विशेष म्हणजे या वर्गातून प्रथम आलेला विद्यार्थी 25 गुणाचा आणि द्वितीय आलेला विद्यार्थी  (आदित्य) 24 गुणांचा म्हणजे गुणवत्तेने आणि संख्येने अधिक अभ्यासाला लागलेला हा वर्ग असे या परीक्षेच्या निमित्ताने दिसून आले. या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गुण अधिक घेण्यासाठीची सकारात्मक स्पर्धा निर्माण झालेली आहे. एकमेकांना छान मदत करत अभ्यास करत आहेत. तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म च्या मदतीने तयार झालेले सराव पेपरही देण्यात येत आहेत. त्यांची ही चांगली मदत विद्यार्थ्यांना होत आहे. 


*सुपर ग्रुप मधील स्पर्धा!*

इयत्ता चौथीतील लक्ष्मण पहिल्या स्पर्धेमध्ये 25 पैकी 25 गुण घेणारा एकमेव विद्यार्थी होता. त्याच्यासह चार विद्यार्थी या सुपर ग्रुप मध्ये होते. यावेळी सातवीतील तनुजा आणि पाचवीतील ओमराज यांच्यात तुल्यबळ लढत झाली. समान गुणावर दोघे आल्या नंतर त्यांची तोंडी परीक्षा झाली. चार पैकी तीन प्रश्नांना दोघांनी बरोबर उत्तर दिले आणि चौथ्या प्रश्नावर ओमराजला माघार घ्यावी लागली.

बुधवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. 


*निकाल :*

इयत्ता 4 थी: कु श्रावणी केशव मुंडे

इयत्ता 5 वी: चि स्वप्निल रमेश केंद्रे

(रनर अप: कु अमृता मारुती मुंडे) 

इयत्ता 6 वी: कु गायत्री भागवत मुंडे 

इयत्ता 7 वी: कु आराध्या पंढरी मुंडे 

सुपर ग्रुप: कु तनुजा दशरथ मुंडे 

(रनर अप: ओमराज बळीराम मुंडे)


*सर्व विजेत्यांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!* 🎉🌹💐



















मिश्किल, मृदु स्वभावी गुलाबराव सरांचे असे अचानक जाणे....

वैद्यनाथ विद्यालयातील माधवबागच्या शाखेत शिक्षण घेतलेल्या जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रिय शिक्षक असलेले श्री गुलाबराव देशमुख सर... अगदी नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावात गुलाबाच्या सुगंधाची आणि कोमलतेची जाणीव व्हायची.... सद्गुणांचा सुगंध आणि मायेच्या ममतेने विद्यार्थ्यांशी बोलणे - वागणे यामुळे विद्यार्थ्यांना प्रिय झालेले शिक्षक... शिकवायचे इतिहास आणि हाती नसायचे पुस्तक! खळाळता प्रवाह जसा सहजगत्या पुढे जातो तसेच अगदी त्यांच्या तासात विद्यार्थी रममाण व्हायचे....

अमूक तमुक ढमूक.... हा त्यांच्या सहज बोलण्यात वापरला जाणारा शब्दप्रयोग मला वाटते विद्यार्थ्यांना आजही चांगलाच आठवत असेल ..... प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक ओळख आणि त्याच्याशी जोडलेले नाते, पाठ शिकवत असताना प्रसंगयोचित त्यांनी केलेले सात्विक विनोद यामुळे त्यांचा तास कधीच संपू नये असे विद्यार्थ्यांना वाटायचे.... त्यांचे अनेक माजी विद्यार्थी आजही त्यांच्या संपर्कात होते... त्यांचा तास अचानक असा 2 मार्च 2026 रोजी संपला....

अगदी काल-परवापर्यंत चांगले चालते - बोलते असणारे सर असे अचानक आपल्यातून निघून जातील असे त्यांच्या कुटुंबीयांना आणि विद्यार्थ्यांनाही वाटले नव्हते....

जवळपास प्रत्येक गुरु पौर्णिमेला सरांच्या भेटीचा निश्चय मी केलेला होता आणि मागच्या अनेक वर्षात घरी जाऊन त्यांच्याशी मनमुराद गप्पा ही मारायचो...

1993 ला माझे डीएड सुरू असताना अंबाजोगाईच्या बस स्टँडवर सरांची भेट झाली त्यावेळी 'इकडे कसे काय?' असे विचारल्यानंतर सरांनी एमए करत असल्याचे सांगितले... अखंड शिकत राहण्याचा मार्ग त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वानुभवातून दिला.

मागच्या साडेतीन-चार महिने अगोदर सरांच्या मिसेसचे निधन झाले.... सेवानिवृत्तीनंतर सरांचा घरी अधिक वेळ जायचा आणि दोघांचे नाते अधिकच दृढ झालेले होते... त्यावेळी आम्ही भेटायला गेल्यानंतर वहिनींच्या आठवणीत सर रडले होते.... विद्यार्थ्यांना जीवनातील विविध विषयाचे ज्ञान देणारे आमचे गुरु त्यावेळी किती भावनिक होते याची प्रचिती आली.... वहिनींच्या आठवणीतच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे कदाचित लवकरच ते आपल्याला सोडून गेले....

माझ्या वयाच्या पन्नाशीत आजही कधी - कधी जेव्हा उदास वाटायचे तेव्हा सरांना भेटायला जायचो..... गप्पांतून प्रेरणा मिळायची, उत्साह वाढायचा....

10 वी 1991 बॅचच्या आदरणीय श्री गुलाबराव देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना... (अजूनही त्यांच्या नावापुढे कैलासवासी लावण्याची हिंमत होत नाही)  


चंद्रशेखर फुटके

 

रविवार, २५ जानेवारी, २०२६

स्कॉलर केजी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष 11 उत्साहात संपन्न
















 


कृतीयुक्त शिक्षण देणाऱ्या स्कॉलर केजी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत आहे - सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी

स्कॉलर केजी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

भविष्यातील सुजाण नागरिक येथे आकार घेतात - श्री दिवाकर जोशी


आपल्या शालेय जीवनाची सुरुवात असणाऱ्या वयातील बालकांना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्ण आकार देण्याचं काम स्कॉलर केजी स्कूलमध्ये होत असून येथील कृतीयुक्त शिक्षण परळीमध्ये प्रसिद्ध झाले आहे असे प्रतिपादन परळी शहराच्या नूतन नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. स्कॉलर केजी स्कूलच्या जल्लोष११ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर प्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, ऐश्वर्या ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ प्रतिभा ज्ञानोबा सुरवसे, श्री शांतलिंगअप्पा फुटके यांची उपस्थिती होती.

फटाक्यांच्या आतिषबाजीत पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर व्यासपीठावर येतच त्यांचे औक्षण करण्यात आले. सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती आणि मुलींना शाळेची दरवाजे खुली करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करून श्रीफळ वाढवण्यात आले.

उद्घाटिका सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके आणि फुटके परिवारातील महिलांनी केले. प्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांचे स्वागत पवन फुटके व शुभम फुटके यांनी केले. सौ प्रतिभा सुरवसे यांचे स्वागत सौ प्रमिला कदम मॅडम यांनी केले. श्री संगमेश्वर फुटके यांचे स्वागत प्रदीप पिंपळे व अशोक रोकडे यांनी केले.

शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात पालकांनी प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद देत असल्याचे समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक उपक्रम शाळेत राबवणाऱ्या शिक्षिकांचे कौतुक केले.

श्री दिवाकर जोशी यांनी आपल्या भाषणात मुलांना आवडणारी गोष्ट सांगत शालेय जीवनात विद्यार्थी काय घडायचे हे ठरवतात आणि पालकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी असे सांगितले. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेच्या संदर्भातील एक सुंदर गझल सादर केली.

नॅशनल ओलंपियाड स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजयी महिला पालकांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे संचलन व आभार प्रा. प्रवीण फुटके सर यांनी केले. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या पूजा उपाध्याय, शाळेतील विद्यार्थ्यांना आकर्षक ड्रेसिंग पुरवणारे प्रतीक सुरवसे, विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे अरुण भांगे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

जवळपास दोन ते अडीच तास या चिमुकल्या बालकांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिराच्या भव्य व्यासपीठावर नृत्य, नाट्य सादर करत आपल्या पालकांना खुर्चीवर खिळवून ठेवले. विद्येची देवता गणेश, महादेव, कृष्ण, राधा या धार्मिक भूमिकांपासून ते सैनिक, शेतकरी अशा विविध वेशभूषेत असणारी चिमुकली बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पालकांचे प्रबोधन करणारे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले होते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिराचे व्यासपीठ खास थीमने आकर्षित करण्यात आले होते. स्क्रीनवर अभिनय करणारी मुले पाहताच आजोबा, आजी खुश होत होते. पालकांना आकर्षित करणाऱ्या या सोहळ्याचे बहारदार संचलन रसिका चंद्रशेखर फुटके हिने आपल्या खास शैलीत केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्कॉलर केजी स्कूलच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रमिला कदम, सौ राजश्री हलकांचे, सौ संगीता रोकडे, सौ रुचिता वाडे, सौ ज्योती वळसे, सौ अमृता मालेवार, सौ सुनैना गुट्टे, सौ अश्विनी तांदळे, सौ वेणूताई तांदळे आणि फुटके परिवारातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयातील हितचिंतकांनी मोठी मदत केली.

रविवार, १८ जानेवारी, २०२६

स्वतःला वेळ दिलेली एक आनंदाची सहल!

 




आपण अनेकदा आयुष्यात इतके गंभीर होतो की 'जगणे' विसरून फक्त 'टिकून राहणे' (Survive करणे) यालाच प्राधान्य देतो. पण मनमुराद हसणं, नाचणं आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे लक्झरी नसून ती एक गरज आहे, आणि हे लक्षात घेऊनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथील विद्यार्थ्यांची 'फक्त आनंद' देणारी एक सहल काढण्याचे ठरले! लातूर जिल्ह्यातील 'वृंदावन पार्क, चाकूर' हे त्यासाठी अतिशय योग्य ठिकाण असल्याचे निश्चित झाले!

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एस टी बसच हवी हा मुख्याध्यापकांचा आग्रह मान्य करून बीडच्या मान्यतेपासूनचा सर्व खडतर प्रवास पूर्ण करून आमची सहल शनिवारी चाकूरच्या दिशेने सकाळी साडेसहा वाजता रवाना झाली! सहलीची तयारी करण्यासाठी मुले रात्री पावणेतीन वाजता सुद्धा दचकून उठत होती हे आम्हाला बसमध्ये गप्पा मारताना कळले! 

Early bird catches the worm! आमची बस वृंदावन पार्कमध्ये पहिल्या क्रमांकांने आली होती मग फायदा तर निश्चितच होणार होता! सकाळचा नाश्ता, तिकिटं, प्रवेश प्रक्रिया लवकर झाली आणि मग सुरू झाली मजेदार सफर! डॅशिंग कारमध्ये एकमेकांना डॅश देताना काही डॅशिंग तर काही भित्रे झाले होते! झुकूझुकू आवाज काढत चालणारी रेल्वे तळ्याभोवती फिरताना अनेक स्तब्ध प्राण्यांच्या भेटी झाल्या; ब्रिजवर गाडी आली तेव्हा मुलांच्या आनंदाचा आवाज उंचावर गेला होता. 

ज्या तळ्याभोवती रेल्वेने प्रवास केला आता त्याच तळ्यात मुले बोटीत बसून फिरत होती, इंजिनावर चालणारी ही बोट बऱ्यापैकी आनंद देत होती. 

आता पुढे होती अशी काही खेळणी जी काहींच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ठरली! ही बोट होती लाईटवर चालणारी; पण हिंदोळा घेऊन एकाच ठिकाणी जुन्या घड्याळातील दोलकासारखे आंदोलन करणारी! झोकाही होता जणू जंगली! बाहेर फेकून देणारा! वेगाची आवड असणाऱ्या मुलांना हा वेग कमी वाटला तर काही शिक्षकांना त्याची भीतीही वाटली.... अम्युजमेंट पार्क मधल शेवटचा टप्पा होता जरासा साहसी! लोखंडीरोपवर स्वतःला टांगून घेऊन तळ्यावरून जाण्याचा! शाळेतील बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी यात स्वतःचे साहस दाखवले; मुलीही कमी नव्हत्या! 

आता दुपारचा दीड वाजला होता आणि सकाळी दहापासूनची वेळ जणू पंख लावून भूर उडून गेली होती. घरून आणलेल्या डब्यांच्या खमंग सुवासाने भूक वाढली होती तरीही भरभर पोटात घास जात होते; कारण पुढचा टप्पा होता वॉटरपार्कचा म्हणजे जरा अधिकच आनंदाचा! 

जेव्हा आपण मनापासून हसतो किंवा गाण्यावर नाचतो, तेव्हा आपल्या शरीरात 'एंडोर्फिन' नावाचे 'फील गुड' हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स नैसर्गिकरित्या तणाव कमी करतात आणि आपल्याला आनंदी ठेवतात. हा आनंद वॉटरपार्क मध्ये पदोपदी मिळत होता. अगदी लहान विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांची काळजी घेत या ठिकाणी पाण्याची पातळी ठेवण्यात आली होती. साहसी खेळाडूंना आकर्षित करतील अशा राईड आणि मुलांना आनंद देतील अशी गाणी सोबत होती. रेन डान्स, वेव डान्स... सगळेच कसे आनंदाने डोलवणारे! सुमारे तीन तास विद्यार्थी आणि शिक्षक या आनंदात अक्षरशः चिंब भिजून गेले! कितीदा भिजले आणि कितीदा वाळले याची गणती नाही! 

पाच वाजता काहींच्या पोटातील कावळ्यांनी कावकाव केली आणि सगळ्यांनी रेस्टॉरंट गाठले. सकाळच्या सपक नाश्त्यापेक्षा आत्ताचा खमंग स्वयंपाक सगळ्यांनाच आवडला! तुटून पडल्यागत सर्वांनी तो फस्त केला. 

गाडीत बसल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना गाडीच्या आवाजात स्वतःच्या घोरण्याचा आवाज ताल धरून लांबून देण्यात मज्जा आली! अजूनही काही जण गाण्यांच्या, शब्दांच्या भेंड्या खेळता खेळता सहल कशी छान झाली याची चर्चा करत होती. 

परळी जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा गाडीच्या शेवटी बसलेली मोठी मुले गाण्याच्या तालावर नृत्य करत इंदपवाडीत पोहोचली त्यावेळी रात्रीचे आठ वाजून गेले होते. 

धावपळीच्या जगात आपण सतत कोणाचे तरी ऐकत असतो किंवा कोणाला तरी उत्तर देत असतो. जेव्हा आपण मोकळा वेळ स्वतःच्या आवडीप्रमाणे घालवतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. हा "मी-टाइम" (Me-time) आपल्याला आतून समृद्ध करतो. चाकूरच्या सहलीने विद्यार्थ्यांना नक्कीच आतून समृद्ध केले असेल. रविवारच्या आरामानंतर समृद्ध झालेले विद्यार्थी सोमवारी पुन्हा एकदा शाळेच्या मैदानात नव्याने आपल्या चाकोरीबद्ध जीवनाला सुरुवात करतील या आशेने या सहलीचा समारोप झाला. 

सहल यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री चंद्रप्रकाश लोखंडे, जगदीश चौधरी, विष्णू ढाकणे, चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे यांनी मेहनत घेतली. विशेष योगदान लाभले शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशवराव मुंडे आणि श्रीमती शालिनी तांबारे मॅडम यांचे! त्यांनी स्वखुशीने सोबत येऊन छान वेळ दिला. 


शब्दांकन : चंद्रशेखर फुटके ( सहलीतील एक आनंदयात्री)