कृतीयुक्त शिक्षण देणाऱ्या स्कॉलर केजी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत आहे - सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी
स्कॉलर केजी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
भविष्यातील सुजाण नागरिक येथे आकार घेतात - श्री दिवाकर जोशी
आपल्या शालेय जीवनाची सुरुवात असणाऱ्या वयातील बालकांना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्ण आकार देण्याचं काम स्कॉलर केजी स्कूलमध्ये होत असून येथील कृतीयुक्त शिक्षण परळीमध्ये प्रसिद्ध झाले आहे असे प्रतिपादन परळी शहराच्या नूतन नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. स्कॉलर केजी स्कूलच्या जल्लोष११ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष संगमेश्वर फुटके, ऐश्वर्या ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ प्रतिभा ज्ञानोबा सुरवसे, श्री शांतलिंगअप्पा फुटके यांची उपस्थिती होती.
फटाक्यांच्या आतिषबाजीत पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर व्यासपीठावर येतच त्यांचे औक्षण करण्यात आले. सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती आणि मुलींना शाळेची दरवाजे खुली करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करून श्रीफळ वाढवण्यात आले.
उद्घाटिका सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके आणि फुटके परिवारातील महिलांनी केले. प्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांचे स्वागत पवन फुटके व शुभम फुटके यांनी केले. सौ प्रतिभा सुरवसे यांचे स्वागत सौ प्रमिला कदम मॅडम यांनी केले. श्री संगमेश्वर फुटके यांचे स्वागत प्रदीप पिंपळे व अशोक रोकडे यांनी केले.
शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात पालकांनी प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद देत असल्याचे समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक उपक्रम शाळेत राबवणाऱ्या शिक्षिकांचे कौतुक केले.
श्री दिवाकर जोशी यांनी आपल्या भाषणात मुलांना आवडणारी गोष्ट सांगत शालेय जीवनात विद्यार्थी काय घडायचे हे ठरवतात आणि पालकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी असे सांगितले. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेच्या संदर्भातील एक सुंदर गझल सादर केली.
नॅशनल ओलंपियाड स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजयी महिला पालकांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे संचलन व आभार प्रा. प्रवीण फुटके सर यांनी केले. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या पूजा उपाध्याय, शाळेतील विद्यार्थ्यांना आकर्षक ड्रेसिंग पुरवणारे प्रतीक सुरवसे, विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे अरुण भांगे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
जवळपास दोन ते अडीच तास या चिमुकल्या बालकांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिराच्या भव्य व्यासपीठावर नृत्य, नाट्य सादर करत आपल्या पालकांना खुर्चीवर खिळवून ठेवले. विद्येची देवता गणेश, महादेव, कृष्ण, राधा या धार्मिक भूमिकांपासून ते सैनिक, शेतकरी अशा विविध वेशभूषेत असणारी चिमुकली बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पालकांचे प्रबोधन करणारे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिराचे व्यासपीठ खास थीमने आकर्षित करण्यात आले होते. स्क्रीनवर अभिनय करणारी मुले पाहताच आजोबा, आजी खुश होत होते. पालकांना आकर्षित करणाऱ्या या सोहळ्याचे बहारदार संचलन रसिका चंद्रशेखर फुटके हिने आपल्या खास शैलीत केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्कॉलर केजी स्कूलच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रमिला कदम, सौ राजश्री हलकांचे, सौ संगीता रोकडे, सौ रुचिता वाडे, सौ ज्योती वळसे, सौ अमृता मालेवार, सौ सुनैना गुट्टे, सौ अश्विनी तांदळे, सौ वेणूताई तांदळे आणि फुटके परिवारातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयातील हितचिंतकांनी मोठी मदत केली.
































